बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब भोर तालुक्यात दिसेल : संतोष धावले
बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब भोर तालुक्यात दिसेल : संतोष धावले
भोर : बिहार राज्याच्या निवडणुकीत एनडीए आघाडीच्या विजयाने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रातही उमटेल आणि त्याचे प्रतिबिंब भोर तालुक्यातील आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये निश्चितपणे दिसेलअसा विश्वास भाजपा भोर तालुका अध्यक्ष संतोष धावले यांनी व्यक्त केला.
धावले म्हणाले की बिहारमधील नागरिकांनी राज्याच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेत झालेला बदल हेच विजयाचें खरे कारण आहे. गंगा पथ रिव्हर फ्रंट, पाटना मेट्रोसारख्या प्रकल्पांमुळे विकासाला नवे परिमाण मिळाले असून, एनडीए सरकार लोककल्याणासाठी कार्यरत आहे.
बिहारच्या जनतेने हा निर्णय केवळ एक राजकीय समर्थन म्हणून नव्हे, तर विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या सरकारच्या धोरणांना मान्यता देण्यासाठी दिला आहे. महागठबंधनने केवळ आपल्या नेत्यांच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले, तर दुसरीकडे भाजप-प्रणीत एनडीएने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यामुळे बिहारच्या मतदारांनी महागठबंधनला ठामपणे नाकारले, असेही धावले यांनी सांगितले.
भोर तालुक्याच्या राजकारणातही बिहारमधील या जनतेच्या जागरूकतेचा प्रभाव जाणवेल, असा विश्वास धावले यांनी व्यक्त केला. पक्ष संघटना भोर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज असून, जनतेचा विश्वास पुन्हा राखण्यासाठी सर्व कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत आहेत.
भोर नगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही प्रचंड विजय मिळवू असा आम्हाला दृढ विश्वास आहे असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहन केले.




