वेळू-नसरापूर गटातूनच जिल्हा परिषद निवडणूक लढवणार : मा.गणेशभैय्या खुटवड
नसरापूर : भोर तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील काही नेते मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून जिल्हा परिषट गट रचनेत चुकीच्या पद्धतीने फेरफार केले आहेत. जिल्हा परिषद गटरचना करताना प्रशासनाने नैसर्गिक नद्या, ओढे यांच्या हद्दीचा नियम डावलून “कामथडी-भोंगवली” गटातील गुंजवणी नदीच्या पलीकडे असणारी हातवे बु., हातवे खुर्द व तांभाड ही गावे चुकीच्या पद्धतीने गुंजवणी नदीच्या अलिकडे असणाऱ्या “वेळू-नसरापूर” गटात समाविष्ट केली आहेत. तर “वेळू-नसरापूर” गटातील उंबरे, कामथडी व करंदी खेबा हि गावे चुकीच्या पद्धतीने “कामथडी-भोंगवली” गटामध्ये समाविष्ट केली आहेत. राजकीय वरदहस्त व शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही चुकीची गटरचना जरी सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींनी केली असली, तरी आपण “वेळू-नसरापूर” गटातूनच जिल्हा परिषदेची निवडणूक “राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार” पक्षाकडून लढवणार असल्याची माहीती “मा.गणेशभैय्या खुटवड” यांनी दिली.
सन फेब्रुवारी २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींनी डावलली होती. परंतू आपण पक्षाच्या आदेशाचे पालन केले व तेव्हापासून ते आजपर्यंत जवळपास ८ वर्षे पक्षाच्या युवक संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा खंबीरपणे सांभाळली. पक्षाची विचारधारा, ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले. पक्षाच्या युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना गेल्या ८ वर्षांपासून “वेळू-नसरापूर” गटातील सर्व गावांत विविध समाजपयोगी उपक्रम राबवले. लोकांच्या सतत संपर्कात राहून त्यांची जनहिताची व विविध विकासकामे “खासदार सौ.सुप्रियाताई सुळे” यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्या ४ वर्षांपासून आपल्या “उंबरे” गावच्या सरपंचपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळत असताना गावात जवळपास “४ कोटी रू.” हून अधिकची विकासकामे पूर्ण केली.
राजकीय स्थित्यंतरांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे २ गट झाल्यावर पक्षातील बहुतेक प्रस्थापित नेते अजितदादांच्या गटात गेले, परंतू आपण एकनिष्ठेने “पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब” यांच्यासोबत राहून प्रस्थापितांच्या विरोधात पक्ष संघटनेचे काम सुरू ठेवले. तब्बल ४ वर्षे उशीराने आता जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली असताना सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींनी प्रशासनाच्या माध्यमातून एकूण ६ गावांची चुकीची आदलाबदल जरी केली असली तरी आपले कार्यक्षेत्र हे वेळू-नसरापूर गटातच आहे. तसेच आपली हक्काची ३ गावे दुसऱ्या गटात समाविष्ट केली असली, तरी या गटातील इतर सर्व गावे तसेच नवीन समाविष्ट केलेली ३ गावे हि सुद्धा आपल्याला तेवढीच हक्काची आहेत. “वेळू-नसरापूर” गटातील सर्व गावांतील नागरीकांशी असलेला जनसंपर्क तसेच या गटात राबविलेले विविध सामाजिक उपक्रम. यामुळे आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक आपण “वेळू-नसरापूर” गटातूनच लढवणार आहोत, अशी ठोस भूमिका मा.गणेशभैय्या खुटवड यांनी घेतली आहे.




