महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ! राजगड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने बुजवले खड्डे
कापूरहोळ : पुणे-बेंगलोर हायवेवरील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्यांबाबत प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने नवरात्री सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निगडे गावच्या हद्दीतील राजगड कारखाना पुल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करण्याकरिता शनिवार (२७ सप्टेंबर) राजगड पोलिस स्टेशनच्या वाहतूक विभागातील पोलिसांनी पुढाकार घेतला होता.
कापूरहोळ महत्त्वाच्या चौकांपासुन राजगड कारखान्याच्या पुला पर्यंत पुणे बेंगलोर महामार्गांवर पडलेले खड्डे वाहतूक पोलीसानी स्वतः रस्त्यावर उतरून जेसीबी (JCB) च्या साह्याने बुजवले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून प्रशासनाने ही अशा पद्धतीने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी कापूरहोळ गावचे हॉटेल व्यावसायिक रुपेश देवघरे यांनी केली आहे.
राजगड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी भुरटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत व वार्डन पंकज शिंदे, निसर्ग कांबळे या सर्व कर्मचाऱ्यांनी कापूरहोळ ते निगडे गावच्या परिसरातील पुणे-बेंगलोर महामार्गावर पडलेले खड्डे (JCB) जेसीबीच्या साह्याने बुजवले. या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांना सुरक्षित व वेगवान मार्गक्रमण करने शक्य झाले आहे.
या कार्याची प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशंसा होत आहे. नवरात्र सणासुदीच्या गर्दीत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जाणिव ही लोकसेवेत पोलीस हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणारी ठरली आहे, पोलिसांचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.




