रुग्णवाहिकेमध्येच गर्भवती महिलेची प्रस्तुती : सुदैवाने बाळ व आई सुखरुप
कापूरहोळ : भोर तालुक्यातील भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सौ.भारती चव्हाण वय २६ वर्ष राहणार करंदी (नसरापूर) या गर्भवती महिलेची प्रसूतीची कळा सुरू होत्या. बराच प्रयत्न करूनही प्रसूती होत नसल्याने व बाळाने पोटात शी-सु केल्याने, तेथील डॉक्टरांनी त्यांना भोर ग्रामीण रुग्णालय अथवा ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता.
किकवी सबसेंटर मधून १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेला
कॉल कऱण्यात आला. हा कॉल इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. मंदार माळी व विशाल कदम यांनी स्वीकारला. गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेमधून घेऊन जात असताना, तिच्या प्रस्तुतीच्या कळा तीव्र झाल्याने व प्रसंगावधानाने डॉ. मंदार माळी यांनी शांतता व सावधगिरी बाळगत रुग्णवाहिकेमध्ये त्या महिलेची सुरक्षित प्रसूती करून दाखवली.
डॉ. मंदार माळी यांच्याकरिता ही आव्हानात्मक परिस्थीती होती, प्रस्तुतीमध्ये बाळाच्या मानेला नाळेचे तीन वेढे होते तसेच पोटात बाळाने शी-सु केलेली होती, अशा कठीण परिस्थितीतही ३.९ किलो वजनाचे निरोगी बाळ सुखरूप जन्माला आले. दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. याप्रसंगी पायलट विशाल कदम व आशा वर्कर सुषमा कोंढाळकर यानी मोलाचे सहकार्य केले.
गर्भवती महिलेची प्रस्तुती सुखरुप झाल्यानंतर नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी १०८ आपत्कालीन सेवा तसेच डॉ. मंदार माळी, विशाल कदम, आशा वर्कर सुषमा कोंढाळकर, डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉ. प्रियांक जावळे, एडीएम सुजित पाटील व एडीएम संतोष येनपुरे या सर्वांचे आभार मानले, या घटनेनंतर डॉ. मंदार माळी यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.




