राजकीय

भोर तालुक्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार ?


 

कापूरहोळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणाच्या प्रारूप आराखड्यानंतर भोर तालुक्यात सर्वपक्षीय इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असुन आरक्षण अद्याप जाहीर झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून गणपती मंडळांना भेट देणे किंवा आरतीला जाणे, विविध समारंभ, सुख-दुःखाच्या कार्यक्रमातून इच्छुकांचा वावर वाढला आहे.

पूर्वीच्या ३ गट व ६ गण ऐवजी नव्याने ४ गट आणि ८ गण झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का ? तसेच घराणेशाही सारखे गावशाही बंद होणार का ? याकडे सर्व तरुणाईचे लक्ष लागुन राहिले आहे, त्यात कोण कोणत्या पक्षाच्या माध्यमातून समोर येणार आणि कोण बाजी मारणार यावर  तालुक्यात चर्चाचे फड रंगू लागले आहेत.

यापूर्वी तालुक्यात ३ गट आणि ६ गण होते. त्यात १ गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे, १ गट शिवसेनेकडे आणि १ गट काँग्रेस कडे होता. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीकडे ४ गण तर शिवसेनेकडे १ गण आणि कॉग्रेसकडे १ गण होता, नविन चेहऱ्यांना कोणता पक्ष संधी देतोय की जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळतेय हे पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

Advertisement

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (AP), शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांच्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी कमालीची चुरस दिसून येईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (SP), शिवसेना (उ.बा.ठा.) आणि काँग्रेसकडून जिल्हा परिषद गटामध्ये व पंचायत समिती गणात तुल्यबळ उमेदवार दिले जातील. भाजपला जिल्हा परिषदेत जास्त जागा आणि पंचायत समितीत सत्ता मिळविण्याच्या हेतूने माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यूहरचना सुरू केल्याचे मानले जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला आव्हान देणारे किंवा शिवसेना,भाजप,काँग्रेसच्या माध्यमातून पर्याय ठरणारे उमेदवार जनते समोर येणार आहेत. म्हणूनच हक्काच्या गट-गणामध्ये जर वेगळे आरक्षण आल्यावर किंवा पक्षाकडून संधी न मिळाल्यास काही उमेदवारांना वेगळी वाट धरून निवडून यावेच लागणार आहे.

विकास धोरण यापेक्षा गट, गणातील भाग, नातेसंबंध, मित्र परिवार, संपर्क आणि उमेदवाराचे सामाजिक स्थान यावर विजयाची गणिते मांडली जाणार आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत कोण काय फासे टाकणार याकडे तालुक्यातील तरुणांचे लक्ष लागून असणार आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!