मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवणे सुलभ ! हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवरून महाराष्ट्र शासनाचा निर्णय
मुंबई : दि. २ सप्टेंबर (मंगळवार) मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील ऐतिहासिक नोंदी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने नवी कार्यपद्धती जाहीर केली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार, स्थानिक पातळीवर गावनिहाय समित्या गठित करण्यात येणार आहेत. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. समिती अर्जदारांची स्थानिक चौकशी करून अहवाल सादर करेल. त्यानुसार सक्षम प्राधिकारी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतील.
जमिनीचा मालकी हक्क नसलेल्या व्यक्तींनी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी पूर्वज संबंधित गावात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर गावातील किंवा कुळातील आधीपासून कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नातलगांकडूनही प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. वंशावळ समितीच्या सहाय्याने चौकशी करूनच प्रमाणपत्र दिले जाईल.
मराठवाड्यातील कुणबी- मराठा समाजाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समिती गेल्या दोन वर्षांपासून नोंदी शोधण्याचे काम करीत आहे. या समितीने हैद्राबाद, दिल्ली तसेच मराठवाड्यातील शासकीय कार्यालयांतून हजारो कागदपत्रे गोळा केली आहेत. निजामशाही काळातील अभिलेखांमध्ये “कापू” या नावाने कुणबी समाजाची नोंद आढळते.
राज्य सरकारने समितीच्या शिफारशी मान्य करून दि. १८ जुलै २०२४ रोजी सुधारित नियम प्रसिद्ध केले होते. त्या आधारे मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र आता नव्या निर्णयामुळे अर्जदारांना जात दाखला मिळवणे अधिक सोपे होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.




