जिल्हा परिषद,पंचायत समिती इच्छुकांची लगबग
भोर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांना भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये इच्छुक उमेदवारांची निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आजी-माजी आणि नवीन उमेदवार गावोगावी फिरून मतदारांशी संपर्क साधत आहेत. गावकऱ्यांना नमस्कार करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अशा विविध मार्गांनी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात अनेक इच्छुकांनी गावा-गावातून गणेश जयंती, इतर महामुरूषांची जयंती असो की कोणा कार्यकर्त्याचा वाढदिवस असो फ्लेक्स लावून शुभेच्छा देण्याचा सपाटा लावला आहे. गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने उमेदवारांनी गणातील गणेश मंडळांना जी मदत लागेल ती मदत करुन त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सामाजिक कार्यक्रमांत इच्छुक उमेदवार हजेरी लावत आहेत. एखाद्या गावात मृत्यू कार्य असल्यास अंत्यसंस्कारापर्यंत उपस्थित राहणे, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे, अशा मार्गांनी इच्छुक उमेदवार मतदारांशी जवळीक साधत आहेत.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या दोन्ही इच्छुक ठिकाणी जर जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली, तर अनेक उमेदवार आपल्या पत्नींना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढण्याची तयारीही अनेकांनी सुरू केली आहे.