दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला किकवीचे सरपंच नवनाथ कदम विशेष अतिथी
किकवी : दिल्लीतील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय परेड सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी भोर तालुक्यातील किकवी ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ कदम यांना निमंत्रण मिळाले आहे. ते सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ सरपंचांना दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मानाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील किकवी ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ कदम यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आणि भोर तालुक्याच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विशेष निमंत्रणाचे श्रेय नवनाथ कदम यांनी भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग, पुणे जिल्हा परिषद, भोर पंचायत समिती, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांना सरपंच पदाची संधी देणाऱ्या ग्रामपंचायत किकवी येथील ग्रामस्थांना दिले आहे.
ग्रामपंचायती तर्फे राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निर्मिती, शुद्ध पाण्याचे फिल्टर प्लांट, स्वच्छ व सुंदर शाळा, बंदिस्त गटारे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पर्यावरणपूरक, नाविन्यपूर्ण आणि सेवाभावी उपक्रमांची दखल घेऊन सरपंच नवनाथ कदम यांना सन्मानाची संधी मिळाली आहे. ग्रामपंचायत किकवी अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रास सुंदर माझा दवाखाना, या व्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक लोकोपयोगी उपक्रमांमुळे या गावाची एक वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे.




