मराठा समाजाच्या बैठकीत विवाहासंबंधित आचारसंहिता जाहीर : हुंडा देणार नाही – हुंडा घेणार नाही
पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाज जागरूक झाला असुन पुण्यातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे मराठा समाज्याची विवाह संदर्भात बैठक झाली. मराठा समाजाने विवाह सोहळ्या संदर्भातील काही प्रमुख आचारसंहिता यावेळी जाहीर केली. मराठा समजातील लग्नात यावेळी हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही असा निश्चय करण्यात आला, ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटी – बेटी व्यवहार करणार नाही तसेच ते कुटुंब मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
बैठकीत अनावश्यक खर्च, डीजे, फटाके आणि प्री-वेडिंग शूटसारख्या दिखाऊ गोष्टींना विरोध दर्शवण्यात आला. विवाह खर्च कमी करणे, दोन्ही कुटुंबांनी तो सामायिक करणे, आणि विवाह संस्कार हे केवळ कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडणे, असे ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीस उपस्थित असलेल्या तरुण, तरुणी आणि पालकांनीही या निर्णयांचे स्वागत करत, सामाजिक परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलं आहे.
काही महत्त्वाच्या सूचना आणि नियमावली
१) विवाह ठरविताना दोन्ही कुटुंबीयांच्या पार्श्वभूमी बाबत सखोल माहिती घ्यावी.
२) तरुण-तरुणी यांची बैठक घेऊन चर्चेद्वारे त्यांच्याकरिता एक आचारसंहिता ठरवली जाईल.
३) महिलांकरिता एक बैठक घेऊन चर्चेद्वारे एक आचारसंहिता ठरवली जाईल.
४) प्रतिष्ठेच्या संकल्पना बदलाव्या लागतील त्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल.
५) पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदलण्यास काही कालावधी जाईल याकरिता आवश्यक जन जागृती सातत्याने मराठा समाज प्रयत्न करेल.
६) आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा समाजाने गौरव करावा, तसेच समाजातील आदर्श विवाह सोहळ्याचे अनुकरण करण्यात येईल.
७) मुला आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे.
८) येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नियमावली आणि आचारसंहिता याबाबत चर्चा करून संपूर्ण समाजासाठी त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न करेल.
९) यावरील सर्व बाबी अंमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीची समिती अथवा मंडळ स्थापन केले जाईल. यामध्ये सहभागी कोणतीही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय व्यावसायिक सामाजिक इत्यादी गैरफायदा येणाऱ्या मानसिकतेची नसावी याची पूर्ण खात्री केली जाईल.
१०) वरीलप्रमाणे गावागावात समिती नेमून काही अनुचित प्रकार होत असल्यास मध्यस्थी करून त्यांना रोखवे.




