भोर विधानसभेच्या जागेचा तिढा सुटेना ; महायुतीचा उमेदवार ठरेना
भोर विधानसभेत महायुती मधील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे, महायुतीतील या जागेचा तिढा सुटत नसल्याने डोकेदुखी वाढत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष किरण दगडे पाटील, मा. आमदार शरद ढमाले, विद्यमान भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गट यांच्याकडून मा. जिल्हा परिषद सदस्य कुलदीप पांडे, मुळशीचे मा. सभापती बाळासाहेब चांदेरे हे असुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाकडुन मा. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे इच्छुक आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे एकच नाव अधिकृतपणे उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे पाठवले गेले होते, त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, भोर विधानसभा मतदारसंघात प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे.
महायुतीमध्ये भोर विधानसभा मतदार संघातील जागेबाबत तिढा सुटत नसल्याने या मतदारसंघातील घोषणा रखडली आहे, ही जागा पारंपारिक शिवसेनेची असल्याने शिंदे गट आग्रही आहे. भाजपकडून ही जागा उमेदवारासाठी मागितली जात असल्याने या जागेवर काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.




