भोरमध्ये अंगणवाडी सेविकांना “पोषण भी पढाई भी” प्रशिक्षणातून सशक्त मार्गदर्शन
हिर्डोशी, ता. २२ : भोर उपजिल्हा रुग्णालय येथे गुरुवार (ता. २०) ते शनिवार (ता. २२) दरम्यान ‘पोषण भी पढाई भी’ या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत भोर एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी पर्यवेक्षिका प्रतिभा बरबरे, अस्मिता सस्ते, संगीता जाधवर, जयश्री मोहिते, निर्मला तावरे आणि क्षमा चव्हाण यांनी बालविकास क्षेत्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचे पोषण, आरोग्य, सर्वांगीण विकास, तसेच पालकांचा सहभाग यावर विशेष भर दिला गेला.
दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. शिवाय नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी अभ्यासक्रमातील बदलांची सखोल माहिती देण्यात आली.या प्रसंगी भोर तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.
प्रशिक्षण सत्रांमुळे सेविकांना बालविकासासाठी नव्या संकल्पना आणि कार्यपद्धतींचे ज्ञान मिळाले असून, त्या आपल्या केंद्रांवर अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.




