सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा ; मंदिराचे मोठ्या उत्साहात लोकार्पण


 

भोर : 1 जानेवारी 2025 बुधवार रोजी भोर तालुक्यातील आपटी  या गावात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या स्वराज्य भूमीत आध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने साकारलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल महाराज पारठे यांनी शिवालयाची निर्मिती व्हावी, यासाठी आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर स्वराज्य उभारणीसाठी हातभार लावलेल्या मावळ्यांच्या वंशजांच्या हस्ते 1 जानेवारी 2022 ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन केले होते.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे काम गेले 3 वर्षे चालू होते, मंदिराच्या बांधकामास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक तसेच अनेक शिवभक्त, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी मदतीचा हात पुढे करत जवळ- जवळ 36 लाख रुपये जमा करुन मंदिराचे काम पुर्ण करण्यात मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सुरुवात सकाळी 7 वाजता श्री जननी देवीचा अभिषेक करुन झाली, सकाळी 9 ते 12 यावेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली व गावाला ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रम देण्यात आले ह.भ.प अनिल देवळेकर महाराज यांची कीर्तन सेवा झाली व सर्व आलेल्या शिवप्रेमींना रात्री महाप्रसाद देण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!