भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटात राजकीय युद्ध ! अपक्षांची आघाडी ठरणार किंगमेकर !! उद्याच्या माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार
कापूरहोळ : भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत उद्या संपत असून, त्यानंतरच या निवडणुकीचे खरे आणि निर्णायक चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, दोन्हीं शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यात सरळ लढतीचे संकेत असले तरी, पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींमुळे अपक्षाच्या आघाडीची शक्यता अधिकच बळावली आहे. ही आघाडी प्रत्यक्षात उतरली तर प्रमुख पक्षांचे राजकीय गणित कोलमडण्याची दाट शक्यता आहे.
भोंगवली- कामथडी जिल्हा परिषद गटात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून वैभव धाडवे, भाजपकडून महेश टापरे, राष्ट्रवादीकडून विक्रम खुटवड, शिवसेना शिंदे गटातून महादेव सोनवणे, शिवसेना (UBT) कडून दशरथ गोळे, अपक्ष राहुल लेकावळे, दशरथ जाधव व अपक्ष आघाडीचे उमेदवार चंद्रकांत बाठे यांच्यात थेट आणि टोकाची लढत पाहायला मिळणार आहे.
भोंगवली पंचायत समिती गणात भाजप कडून रोहन बाठे, राष्ट्रवादीतुन गणेश गोविंद निगडे, शिवसेना शिंदे गटातून विकास चव्हाण, अपक्ष उमेदवार सुनिल चोरघे, विनोद चौधरी,विश्वजीत जगताप, गणेश शरदराव निगडे, जयसिंग निगडे, वसंत परबळ, हर्षद बोबडे, राजेंद्र मोरे, उदय शिंदे आणि अपक्ष आघाडीचे उमेदवार अक्षयभैया सोनवणे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे.
तर कामथडी गणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून वैशाली गाडे,
भाजपच्या नीता इंगुळकर, राष्ट्रवादीकडून तृप्ती खुटवड, शिवसेना शिंदे गटाच्या क्रांती धुमाळ, शिवसेना (UBT) कडून मोनिका जाधव यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. या तिन्ही ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना असला तरी निकाल इतका सोपा राहणार नाही, हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर नाराज नेते, पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलेले कार्यकर्ते आणि स्वतंत्र राजकीय समीकरणे जुळवणारे प्रभावी चेहरे एकत्र येऊन पाचवी आघाडी उभारण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीने तिकीट कापल्याने नाराज झालेले चंद्रकांत बाठे आणि भोंगवली गणाचे अक्षयभैया सोनवणे यांनी एकत्र येऊन निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ही आघाडी अधिकृतपणे जाहीर झाली असुन राष्ट्रवादीसह इतर पक्षांची मते विभागली जाणे अटळ मानले जात आहे.
राष्ट्रवादी व भाजप बरोबरच दोन्हीं शिवसेना गटासह राष्ट्रीय काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रचारात पुर्ण ताकद झोकून दिली असून गावोगावी बैठका, घरोघरी संपर्क दौरे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विकासकामांचे श्रेय, मागील कार्यकाळातील अपयश, पाणी, रस्ते, आरोग्य, वीज यांसारख्या स्थानिक प्रश्नांवरून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. मात्र या गदारोळात पाचवी आघाडी आणि अपक्ष उमेदवारांची हालचालच खरी निर्णायक ठरणार आहे. असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने लढत अधिकच बहुरंगी झाली आहे. काही अपक्ष उमेदवार हे स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले असून ते मोठ्या पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मतांचे विभाजन नेमके कोणाच्या फायद्यात जाणार, याबाबत सध्या तरी कुणीही ठाम दावा करू शकत नाही.
खरी लढत चारही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये दिसत असली तरी अपक्ष आघाडी आणि अपक्षांची ताकद पाहता कोणाचे पारडे जड आहे, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. उद्या (मंगळवार 27 जानेवारी) अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.




