महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा ! भोंदूबाबा खरात प्रकरण भोवलं
मुंबई : शुक्रवार (दि.२० मार्च) भोंदूबाबा अशोक खरात महिला शोषण प्रकरणाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. अखेर त्यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सात ओळींचे राजीनामापत्र सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
खरातला महिलेचे लैंगिक शोषणप्रकरणी अटक झाल्यानंतर चाकणकर यांचे त्यांच्यासोबतचे फोटो आणि पाद्यपूजा व्हिडिओ समोर आले. यामुळे त्यांच्या पदावर प्रश्नचिन्ह उपटले. विरोधकांसह विविध स्तरांतून राजीनाम्याची मागणी होत होती. काही तासांपूर्वीच फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले, अशी माहिती आहे. त्यानंतर चाकणकर यांनी पवार यांची भेट घेत पत्र सादर केले.
राजीनामापत्रात चाकणकर म्हणाल्या मी सौ. रूपाली निलेश चाकणकर दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे.
तसेच पत्रात भविष्यातील सहकार्याची अपेक्षा आणि राजीनामा स्वीकारण्याची नम्र विनंती केली आहे, या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भोंदूबाबा प्रकरणाची चौकशी वेग घेईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




