पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन ! रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण अन् अनाथाश्रमातील मुलांना फराळ वाटप
नसरापूर : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श नवसह्याद्री शिक्षण संकुलाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके यांनी घालून दिला. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आणि अनाथाश्रमातील मुलांना मदत व फराळवाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
नायगाव येथील नवसह्याद्री शिक्षण संकुलात दि.३ नोव्हें.(मंगळवार) रोजी वाढदिवसानिमित्त या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी सुके यांनी पाच लाखांचे योगदान देण्याचे ठरविले.
महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक अशा ५५ जणांनी रक्तदान केले. आरोग्य तपासणी शिबिरात नेत्रतपासणीचाही नागरिकांनी लाभ घेतला. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अनाथाश्रमातील मुलांना मदत आणि दिवाळीचा फराळ वाटप करण्याचा उपक्रमही आखण्यात आला.
यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे, माजी सभापती लहूनाना शेलार, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष धावले, ज्ञानेश्वर पांगारे, विकास कोंडे, आप्पा रेणुसे, अरविंद सोंडकर, बाळासाहेब जायगुडे, मदन खुटवड, आदित्य बोरगे, संदीप पांगारे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.




