हरिश्चंद्रीच्या महिलांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रेरणादायी अभ्यास दौरा ! स्वच्छता, पर्यावरण आणि जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
कापूरहोळ : हरिश्चंद्री ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत महिला सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी सर्वानुमते अनुमोदन दिल्यानंतर बचत गटातील महिला व ग्रामस्थ महिलांसाठी पिरंगुट (ता. मुळशी) येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात एकूण ११३ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दौऱ्यादरम्यान महिलांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. कचऱ्याचे वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा करण्याची पद्धत, कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या विविध तंत्रज्ञानाची माहिती तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे महत्त्व यावेळी महिलांना समजावून सांगण्यात आले.
महिलांनी प्रकल्पातील विविध विभागांची पाहणी करून घनकचरा व्यवस्थापनाची कार्यपद्धती समजून घेतली. गावात स्वच्छता जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हा अनुभव उपयुक्त ठरणार असल्याचे सहभागी महिलांनी सांगितले.
अभ्यास दौऱ्यानंतर उर्वरित वेळेत महिलांनी हाडशी येथील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर तसेच खारावडे येथील श्री म्हसोबा मंदिराचे दर्शन घेतले. ज्ञानवर्धक अभ्यासासोबत आध्यात्मिक समाधानाचा लाभ मिळाल्याने महिलांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले.




