भोर तालुक्यात दुर्दैवी घटना ! अंगावर वीज पडून एका तरूणाचा जागीच मृत्यू !! दोन जण जखमी
भोर : भोर तालुक्यातील उत्रोली-कानवडी मार्गावरील परीट मळा परिसरात गुरुवारी दुपारी आकाशीय वीज कोसळून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव शंकर किसन काटेकर (वय २२, रा. वडगाव) असे असून तो दुचाकीवरून प्रवास करत होता. कानवडी गावातून उत्रोलीकडे जात असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास परीट मळा परिसरात जोरदार कडकडाटासह आकाशीय वीज कोसळली. या भीषण घटनेत शंकर काटेकर गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ मदतीचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत चंद्रकांत गणपत वाघमारे (वय २६, रा. वडगाव), सागर शांताराम पवार (वय २५) हे जखमी झाले असून अनिल रवी घोगरेकर (वय १५, रा. वडगाव) याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी झाडाखाली आश्रय घेणे टाळून सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




