बुडालेल्या मुलाच्या मृत्यूने वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू
वसई : रत्नागिरीच्या समुद्रात पोहत असताना स्वतःच्या मुलाचा डोळ्यांसमोरच बुडुन मृत्यू झाला. हा धक्का सहन न झालेल्या वडिलांनीही प्राण सोडले. वसई येथील विनायक फासे (वय – 45) हे कुटुंबासह 17/8/24 (शनिवार) कोकणात पर्यटनासाठी गेले होते, ते वसई-विरार महापालिकेचे वित्त विभागात प्रमुख अधिकारी म्हणुन कार्यरत होते,
रत्नागिरीच्या समुद्रात मुलगा सिद्धार्थ (वय 19) हा पोहण्यासाठी गेला असता त्याने वडिलांना फोटो काढण्यास सांगितले. त्यांनी ही मोबाइलवर फोटो काढले आणि मागे वळून पत्नीकडे जात असताना नेमकी त्याचवेळी एक मोठी लाट आली. तिने सिद्धार्थला ओढून खोल समुद्रात नेले. सिद्धार्थ बुडत असल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी आरडा-ओरड केला असता, तो आवाज ऐकून जीवरक्षक पथकाने धाव घेतली. त्यांनी ताबडतोब सिद्धार्थला पाण्यातून बाहेर काढले.परंतु त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने श्वासोच्छ्वास बंद झाला होता छातीवर दाब देऊन त्याचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला, प्राथमिक उपचार ही केले गेले, पण सिद्धार्थचा जीव काही वाचवु शकले नाहीत.
डोळ्यांसमोरच मुलाच्या मृत्यूचा धक्का विनायक यांना सहन झाला नाही. मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर लागून राहिली होती. मित्रपरिवार, नातेवाईक सांत्वन करत होते; पण विनायक या धक्क्यातुन स्वतःला सावरू शकले नाहीत, आणि सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.
विनायक फासे हे एक कार्यक्षम अधिकारी होते, मुलगा सिद्धार्थही हुशार होता. विनायक फासे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. पिता-पुत्राचे रक्षा आस्ती विसर्जन एकत्रच करण्याचा दुःखद प्रसंग फासे कुटुंबियावर आला आहे.




