पुणे जिल्हा परिषदेत २७ दिव्यांग जोडप्यांचा सत्कार ! समाज कल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकरांच्या हस्ते बचत पत्र वितरण
पुणे : २७ एप्रिल २०२६ (सोमवार) दिव्यांग सक्षमीकरण विभाग पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाह प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत अशा पद्धतीने विवाह झालेल्या २७ जोडप्यांचा सोमवार, दि. २७/०४/२०२६ रोजी शरदचंद्र पवार सभागृहात सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमाने दिव्यांगांच्या जीवनात शासकीय योजनांचा खरा प्रभाव दिसून आला.
कार्यक्रमप्रमुख समाज कल्याण समिती सभापती श्री. जितेंद्र बडेकर, सहाय्यक आयुक्त श्री. राधाकृष्ण देवढे, श्रीमती माधुरी शिंदे व श्रीमती सुनंदा प्यारम उपस्थित होते. श्री. बडेकर यांच्या हस्ते उपस्थित सर्व जोडप्यांना राष्ट्रीय बचत पत्रांचे वितरण करण्यात आले. बोलताना त्यांनी या योजनेचे तळागाळापर्यंत पोहोचणे आणि दिव्यांगांच्या जीवनात अमूल्य बदल घडवण्याचे कौतुक केले.
सत्कारार्थी श्री. अभिजीत गाडे व सौ. किरण पवार यांनी समाधान व्यक्त करत, “शासनाच्या योजनेमुळे आम्हाला ई-सीएसद्वारे २४,५०० रुपये मिळाले व २५,००० रुपयांचे बचत प्रमाणपत्र भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून उपयुक्त ठरेल,” असे सांगितले.
सहाय्यक आयुक्त श्री. राधाकृष्ण देवढे यांनी महत्त्वाची माहिती दिली. शासनाने दि. १८/१२/२०२५ पासून योजनेत बदल केले असून, यापुढे दिव्यांग-दिव्यांग जोडपींना २,५०,००० रुपये व दिव्यांग-अव्यंग जोडपींना १,५०,००० रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. या बदलामुळे योजना अधिक प्रभावी होईल. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नारायण शिंदे यांनी केले तर आभार श्री. संभाजी भांगरे यांनी मानले. या उपक्रमाने दिव्यांग सक्षमीकरणाच्या दिशेने पुणे जिल्हा कायम पुढारलेला असल्याचे सिद्ध झाले.




