दानवले बंधूंची गुरुदक्षिणा ! ज्या शाळेने घडवले, त्या शाळेला रिटर्न गिफ्ट !! विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स उपक्रम
भोर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारे बुद्रुक येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि क्रीडा कौशल्यांना चालना देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून सर्व विद्यार्थ्यांना खेळाच्या टी-शर्टचे (Sports T-shirts) वाटप करण्यात आले. या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री. दशरथ सोनबा दानवले, श्री. विनोद दशरथ दानवले (श्रीशा लॅन्डमार्क), श्री. कंडलिक आनंदा दानवले व श्री. उत्तम आनंदा दानवले (भाग्यानंद अर्थमूव्हर्स) यांनी केले.
ज्या शाळेत त्यांनी शिक्षणाचे पहिले धडे घेतले, त्या शाळेतील चिमुकल्यांच्या स्वप्नांना आता माजी विद्यार्थी बळ देत आहेत. ही गुरुदक्षिणा शाळेसाठी अत्यंत मौल्यवान आहे. एकाच रंगाच्या या टी-शर्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘आम्ही सर्व एक आहोत’ ही भावना निर्माण झाली असून, मैदानावर अधिक आत्मविश्वासाने खेळण्यासाठी ते प्रेरित करणार आहेत.
दानवले कुटुंबाच्या या सहकार्यामुळे मुलांचा खेळातील उत्साह द्विगुणित झाला आहे. ‘मैदानात उतरू, शाळा जिंकवू!’ असा संदेश देत हा उपक्रम साजरा झाला. शाळेच्या विकासासाठी अशा पुढाकारांची गरज आहे.




