राजकीय

भोर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग ! तरुण नेतृत्वाचा राष्ट्रवादीकडे ओढा !! अक्षय सोनवणे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश


 

भोर (प्रतिनिधी) : पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील राजकारणात नव्या घडामोडींना सुरूवात झाली आहे. आज तालुक्याच्या पूर्व भागातील युवा नेतृत्व अक्षय सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्व भागात नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

अक्षय सोनवणे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी शिक्षण, ग्रामविकास आणि शेतकरी समस्या या विषयांवर केलेल्या कार्यामुळे भोर तालुक्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

Advertisement

अजित पवार यांनी या वेळी तरुण कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे सांगितले.सोनवणे यांनी या प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना, आगामी पंचायत समिती निवडणुकीत भोंगवली गणातून उमेदवारी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेमुळे त्या गणात चुरस वाढण्याची शक्यता आहे. कारण याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जुने कार्यकर्तेही उमेदवारीसाठी तयारी करत असल्याचे समजते.

दरम्यान, काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता पाहून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. “नवीन नेत्यांना संधी देताना जुन्या कार्यकर्त्यांच्या श्रमांचा विचार केला जाईल का?” हा प्रश्न आता पक्षाच्या बैठकींमध्ये चर्चेला आला आहे.पक्ष संघटनेत बदल आणि नव्या कार्यकर्त्यांचा समावेश हा पक्ष विस्ताराचा भाग असल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केले असले, तरी स्थानिक स्तरावर या घडामोडींमुळे येत्या निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये बदल घडणार हे निश्चित मानले जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!