नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार ! ठेवीदारांची ४० कोटी रुपयांची फसवणूक !! संचालक, सचिव, व्यवस्थापकासह कर्जदारावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सुनील सावंत,
प्रतिनिधी.
भोर : भोर तालुक्यातील नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार करून ठेवीदारांच्या एकूण ३९ कोटी ८७ लाख ९७ हजार ७१७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापक, सचिव यांच्यासह कर्जदार आशा सुमारे ११२ जणांवर बुधवार (दि.१८) रोजी भोर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत सहकारी संस्था पुणे येथील व्दितीय विषेश लेखापरीक्षक यांनी भोर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या २५ जून २०१० ते ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या आर्थिक व्यवहारात तत्कालीन संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक यांनी संस्थेच्या निधीचे बेकायदेशीरपणे पोटनियमबाह्य पुस्तकी नोंदी करून असुरक्षित तारणांवर व विनातारण उचल करून संगनमताने ठेवीदारांची ३९ कोटी ८७ लाख ९७ हजार ७१७ रुपयांची फसवणूक, अपहार, अफरातफर व बेकायदेशीर गैरव्यवहार करून संस्थेला आर्थिक तोट्यात आणण्याचे काम केले असल्याने रितसर आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि मोठे कर्जदार त्यामध्ये अडकले आहेत. भोर, वेल्हे तालुका, पुणे, सातारा येथील राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी यांचा त्यामध्ये समावेश आहे. इतक्या मोठया प्रमाणांवर आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक, बेकायदेशिर गैरव्यवहार झाल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. सुमारे ४० वर्षापूर्वी या पतसंस्थेची स्थापना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत रघुनाथ किंन्द्रे यांनी केली होती.भोर,नेरे,नसरापूर,वेल्हे, धनकवडी पुणे येथे त्याच्या शाखा कार्यरत होत्या.
सर्वसामान्यांना पतसंस्थेमुळे अनेक कामात आर्थिक मदत झाली होती पंरतु काही वर्षापूर्वी पदाधिकारी व संचालकांनी संगणमताने विनातारण जवळच्या लोकांना कर्जाचे वाटप केले. त्यामुळे नियमीत खातेदार व ठेवीदार यांना वेळेत पैसे दयायला विलंब होऊ लागला. संस्थेकडे हेलपाटे मारायला सुरवात केल्यावर सर्वच ठेवीदार जागे झाले. सर्वच शाखेत ही परीस्थिती उदभवली.कर्जदार पैसे भरायला तयार नाहीत.
दरम्यान, सहकार खात्याने संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती केली. काही प्रमाणांत वसुली करून सामान्य ठेवीदारांना काही प्रमाणांत पैसे ही दिले. मात्र किमान पाच लाख ते कमाल दिड कोटी रूपये कर्जाची थकीत रक्कम असणाऱ्यावर सहकार खात्याने गुन्हे दाखल केले आहेत.
नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्यामुळे वरिष्ठाच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाईल,भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांनी सांगितले.




