भोरच्या उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने उभारली महिलांच्या हस्ते शांततेची गुढी
वसंत मोरे,
प्रतिनिधी.
भोर : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात खरंतर घरासमोर गुढी उभारून केली जाते, आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये पुरुषांच्या हस्तेच गुढी उभारली जाते, मात्र पुण्याच्या भोर शहरातील उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने यास फाटा देत भोर शहरातील गंगुताई पंतसचिव वाचनालयात पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, हवालदार संगीता टापरे, डॉक्टर संगीता खोकले या मान्यवर महिलाभगिनींच्या हस्ते गुढी उभारून समाजा समोर नवा आदर्श ठेवला आहे.
भोर शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी उन्नती महिला प्रतिष्ठानने आतापर्यंत जशी परखड भूमिका घेतली आहे, ती यापुढेही कायम राहावी अशी अपेक्षा यावेळी महिलांनी व्यक्त केली. वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात, शहरातील स्वयंस्फूर्तीने सहभागी होणारे नागरिक मोठ्या प्रमाणात असतात, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शांतता, आनंदाची गुढ उभारण्यासाठी उन्नती महिला प्रतिष्ठानने पुढाकार घेतला होता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होते.
भोर शहरासह देशभर शांतता नांदावी, महिलांवरील अत्याचार थांबावेत, तसेच नवीन वर्ष सर्वांसाठी सुख-समृद्धीचे जावो, अशी मनोकामना महिलांनी यावेळी व्यक्त केली, शहरातील विविध विकास कामांच्या बाबतीत योगदान देऊ असा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला, यावेळी डॉक्टर संगीता खोकले यांचा श्रीफळ, शाल, सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान केला गेला.
हा कार्यक्रम योग्य पद्धतीने साजरा व्हावा म्हणून अध्यक्ष सिमा तनपुरे, रेखा धरू,मेघा आंबवले, सुजाता धुमाळ, भाग्यश्री वरटे, अश्विनी धोंडे, बाळासाहेब देशमाने, रमेश कोठावळे या मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले.
उन्नती महिला प्रतिष्ठानच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे भोर शहरासह भोर तालुक्यातून कौतुक होत असून यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




