भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात ! रोगप्रादुर्भाव आणि अवकाळी पावसाने भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त
भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत. एका बाजूला भात पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी मुसळधार पावसाने परिस्थिती अधिक भीषण केली आहे. परिणामी मेहनतीने उभे केलेले भात पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले असून, शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडले आहेत.
भोर तालुक्याचा पश्चिम भाग इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असुन तालुक्यात दरवर्षी सुमारे ७५०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते, शेतकऱ्यांचा मुख्य उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून आहे. मात्र यंदा भात पोसण्याच्या अवस्थेत असतानाच पानगळ, करपा व इतर अनोळखी रोगांचा प्रादुर्भाव झाला. या रोगांमुळे भाताच्या ओंब्यांवर काळपट डाग पडून दाणे अपुरे भरले. अजून काही प्रमाणात सुरळीत पीक उरलेले असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या साचलेल्या आशुद्ध पिकांवर पाणी साचले, त्यामुळे शेतातील भात भिजून कुजला. अनेक ठिकाणी ओंब्या झडून फक्त पेंडा उरला आहे.
हिर्डोशी खोरे, महूडे खोरे, वेळवंड खोरे आणि भूतोंडे खोरे या भागात नुकसान सर्वाधिक झाले आहे. काही शेतकऱ्यांनी मजुरी व कापणीचा खर्चही निघणार नाही या भीतीने शेतीत उभे पीक काढण्यास टाळाटाळ केली आहे. काही ठिकाणी आधीच कापलेला भात पाण्यात भिजून सडला असून विक्रीयोग्य राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
हवामानातील अनिश्चितता आणि रोगांची वाढती तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांना संरक्षणात्मक उपाययोजना तसेच बी-बदल योजना राबवण्याची गरज असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी शासनाच्या मदतीची आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे.




