पुणे शहरात १११ ‘पाकिस्तानी’ नागरिक वास्तव्यास : १ मे पर्यंत भारत सोडुन जाण्याचा केंद्र सरकारचा आदेश
पुणे : पहलगाम येथे मंगळवारी (दि. २२) दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परराष्ट्र मंत्रालयामार्फत देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष केंद्रित केले होते. तसेच बुधवारी केंद्र सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्यास सांगितले असुन अटारी-वाघा बॉर्डर वरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मेपर्यंत मायदेशात परत जाता येईल असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
पुणे शहरात केलेल्या चौकशीत सुमारे १११ पाकिस्तानी नागरिक राहात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बहुतांश नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. दीर्घ मुदतीचा व्हिसा हा ५ वर्षांसाठी दिला जातो. त्यानंतर दर २ वर्षांसाठी तो रिन्यू केला जातो तर, व्हिजिटर व्हिसा ४५ ते २० दिवसांसाठी दिला जातो. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी ३५ पुरुष आणि ५६ महिला या दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आले आहेत तर २० पाकिस्तानी व्हिजिटर व्हिसावर आले आहेत.लाँग टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश सर्वाधिक आहे.
3 पाकिस्तानी नागरिकांनी गुरुवारी पुणे पोलिसांकडून एक्झिट पत्र घेऊन पुणे शहर सोडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरांमध्ये हे पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.




