माऊलींच्या दानपेटीतील रक्कम लंपास ! सेवेकऱ्याचा कारनामा उघड !! बेडमध्ये सापडली रोकड
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रकमेवरच विश्वासू सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मंदिर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशाल वारुळे असे संबंधित सेवेकऱ्याचे नाव असून, त्याच्या घरातून तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रोकड १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या पिशव्यांमध्ये आढळून आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
विशाल वारुळे हा गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरातील दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि मोजणीचे काम पाहत होता. याच काळात त्याने दानपेटीतील काही रक्कम हातचलाखीने बाजूला काढून स्वतंत्र पिशव्यांमध्ये साठवण्यास सुरुवात केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोकड भरलेली पिशवी घरी नेताना तो मंदिरातील हार घेऊन जात असल्याचे सांगत असे. पिशवीच्या वर हार ठेवून खाली रोकड लपवली जात होती. घरी गेल्यानंतर ही रक्कम बेडमध्ये लपवून ठेवत असल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




