भोर पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण ! अन्याया विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक !! अनुसूचित समाजाच्या न्यायहक्कासाठी प्रशासनास निवेदन
भोर (प्रतिनिधी) – भोर, वेल्हा व मुळशी विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजाला आरक्षण प्रक्रियेत न्याय द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेना भोर विधानसभा अध्यक्ष किशोर अमोलिक यांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भोर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षण जाहीर करताना अनुसूचित समाजाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेनुसार या समाजाला योग्य प्रतिनिधित्वाचा हक्क असून, तो अबाधित ठेवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र प्रत्यक्षात आरक्षण प्रक्रियेत न्याय न मिळाल्याने अनुसूचित समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
अमोलिक यांनी सांगितले की, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा व सामाजिक न्यायाचा संदेश दिला, परंतु सद्यस्थितीत चालू असलेली आरक्षण प्रक्रिया त्या विचारांच्या विरोधात असल्याचे दिसते.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, रिपब्लिकन सेना या अन्यायाविरोधात संघर्ष उभारणार असून, अनुसूचित समाजाला योग्य आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल.




