स्वातंत्र्यदिना दिवशी तिरंगा अपमान प्रकरणी 3 शिक्षक निलंबित
सुमित पाटील, प्रतिनिधी अकोला.
बार्शिटाकळी : 15 ऑगस्ट रोजी 78 व्या स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घेण्यात आला, शाळेमध्ये 3 शिक्षक होते, त्यांच्यापैकी एकही शिक्षक किंवा कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाच्या देखरेखीसाठी थांबण्या ऐवजी शाळेच्या सर्व वर्ग खोल्यांना कुलुप लावुन,राष्ट्रध्वजाबाबत असणारे सर्वच नियम धाब्यावर बसवुन आपआपल्या घरी निघुन गेले होते.
शाळेचे तीनही शिक्षक दिवसभर जागेवर नसल्यामुळे संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत राष्ट्रध्वज हा खाली उतरवण्यात आला नव्हता.मुख्याध्यापिका या बाहेरगावी होत्या, शिवाय त्याठिकाणी शाळेचे कोणतेच कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली असता त्यांनी हा सर्व प्रकार शिक्षण विस्तार अधिकारी संदीप मालवे,तहसिलदार राजेश वझीरे, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना दिली.मुख्याध्यापिकेला फोन लावला परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ होता, त्यानंतर दुसऱ्या शिक्षिकेला फोन लावला असता, रात्री 7:40 वाजता धोत्रे व काळणे नामक दोन महिला शिक्षिका त्याठिकाणी हजर झाल्या.त्यावेळी पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक राष्ट्रध्वज उतरवण्यात आला.
याप्रकरणाची गंभीर दखल घेत बार्शिटाकळी पोलीसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या विरूध्द नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे तिन्ही शिक्षिकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्यांच्याविरूध्द राष्ट्रध्वज अपमान झाल्याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी संदीप मालवे यांनी दिली.




