तीर्थक्षेत्र आळंदी येथे निर्जला एकादशी निमित्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
गणेश पाटील. खेड प्रतिनीधी.
आळंदी देवाची : तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये नेहमी पेक्षा आज निर्जला एकादशी निमित्त माऊलींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती नेहमी पेक्षा यावेळी गर्दी वाढलेली पाहण्यास मिळाली. माऊलींच्या मंदिरात पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरातील पुष्प सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती, आजच्या खास दिवसाची दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानाने सोशल मीडियाचच्या माध्यमातून केली होती.
माऊली मंदिरात एकादशी निमित्त हरिपाठ, किर्तन सेवा, हरीजागर सेवा झाली. मंदिरात धार्मिक परंपरेने पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य दाखवणे असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
तसेच मंदिरा बाहेर इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर नदीत स्नान करून येथील तीर्थक्षेत्रीचे स्थान महात्म्य जोपासले.
वारकरी, भाविकांनी महाद्वारातून माऊलींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा केली. आळंदीत नगरप्रदक्षिणा मार्ग आणि महाद्वारा समोर रस्त्यावर वाहने लावल्याने वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता, नगरप्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी दोन्ही ही बाजुंनी वाहने लावली गेल्याने येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना मार्ग काढण्यास वेळ लागत होता, यामुळे प्रदक्षिणा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस विभागाने दक्षता घेत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता,मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत करून रहदारीची गैरसोय होणार नाही याची पुर्ण काळजी घेतली गेली.




