मानाच्या दोन्ही गदा परत करणार : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
अहिल्यानगर मध्ये रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धाचा अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पण पृथ्वीराज मोहोळने उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाडवर विजयी मिळवुन मानाची गदा पटकावली. पण या दोन्ही फेरीच्या सामन्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. तसेच सामन्यानंतर पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने 3 वर्षांसाठी निलंबित केले आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली असुन मानाच्या दोन्ही गदा परत करणार असल्याचं चंद्रहार पाटील जाहिर केले आहे.
2007 साली महाराष्ट्र केसरी होत असताना मी सांगली जिल्ह्याला 27 वर्षांनंतर मानाची गदा मिळवून दिली. अनेक वर्ष डबल महाराष्ट्र केसरी कोणीही नव्हतं. पण मला आणि सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळाला. तसेच तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी मैदानात उतरणारा पैलवान मी होतो. आता ज्या प्रकारे शिवराज राक्षेवर पंचांनी अन्याय केला, शिवराज राक्षेला ज्या प्रकारे हरवण्यात आलं. त्याच प्रकारे मलाही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना हरवण्यात आलं होतं, असा आरोप आता चंद्रहार पाटील यांनी केला आहे.
चंद्रहार पाटील पुढे म्हणाले की एका लाईव्ह कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळचे उपाध्यक्ष काकासाहेब पवार यांनी कबुली दिली की चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झालेला आहे. तसेच संदीप आप्पा भोंडवे हे आज कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी देखील कबुली दिली आहे की 2009 मध्ये चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झाला. मग आता सर्वच पदाधिकाऱ्यांनी कबूल करावं की माझ्यावर अन्याय झालेला आहे. मग माझ्या मनाचं समाधान होईल असं चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.




