सामाजिक

नायगावमध्ये सामुदायिक श्रीकृष्ण–तुळशी विवाह सोहळा संपन्न ! परंपरा, एकी आणि सलोखा यांचा संगम !! विशाल कोंडे व सचिन बांदल यांची उपस्थिती


नसरापूर : सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नायगाव ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून पारंपरिक, धार्मिक आणि आनंदी वातावरणात सामुदायिक श्रीकृष्ण–तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नायगाव ग्रामपंचायत, अखिल महिला मंच नायगाव, भजनी मंडळ तथा सर्व तरुण मंडळ नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमामध्ये प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी, एकता आणि परंपरांचे संवर्धन या मूल्यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणला. ग्रामस्थांनी उपस्थितीची उत्तम नोंद ठेवत भजन-कीर्तनांच्या सुरावटींमध्ये, मंगलाष्टकांच्या गजरात व पारंपरिक विधींसह विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विशाल हॉटेल (केळवडे) चे सर्वेसर्वा विशाल उर्फ बंटी शेठ कोंडे यांनी सर्व पाहुण्यांचे तसेच मंडळ सदस्यांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेची सुरुवात केली. त्यानंतर राजतोरण मिसळ हाऊस (दीडघर) चे सर्वेसर्वा सचिन अण्णा बांदल यांनी वधू–वरांना शुभाशिर्वाद देत समाजात अशा पारंपरिक आणि सामूहिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली.या प्रसंगी ग्रामातील मान्यवर निलेश आबासो कोंढाळकर, अंकुश तात्या सावंत यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

महिलांच्या प्रभावी सहभागामुळे कार्यक्रमाचे वातावरण अधिक समृद्ध झाले. सजवलेल्या मंडपात तुळशीमाई आणि श्रीकृष्णाच्या मूर्तींवर सुंदर पुष्पसजावट करण्यात आली होती. कीर्तन, भजन आणि पारंपरिक मंगलगीतांच्या माध्यमातून श्रद्धा आणि भक्तीचे सुंदर दर्शन घडले.

श्रीकृष्ण–तुळशी विवाहानंतर प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्याच्या आयोजनामुळे ग्रामस्थांमध्ये केवळ धार्मिक एकतेची नव्हे, तर सामाजिक सलोख्याची व सहकारभावनेची नवचैतन्य निर्माण झाली. भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि परंपरा पुढील पिढीकडे पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून प्रभावीरीत्या साधले गेले.

भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सामुदायिक विवाह सोहळा नायगाव ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचा आणि सांस्कृतिक सजगतेचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!