एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर वेगवान घडामोडी होत असून एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असून महायुतीतील कोणता नेता मुख्यमंत्री होणार याची घोषणा होणार आहे. तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणुन काम पाहतील.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे महायुतीमध्ये तसेच राज्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, त्यामध्ये चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपुष्टात येत असल्याने एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे.
आज 15 व्या नवीन विधानसभेची स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल, महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिळतील आणि मंत्रिमंडळात राज्यभरातून कोण-कोणत्या नेत्यांची वर्णी लागतेय ते महाराष्ट्राला काही तासातच कळेल.




