जिल्हा परिषद शाळांमध्ये नवचैतन्य ! नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत !! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे : विक्रम खुटवड
कापूरहोळ : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव उपक्रमाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या निमित्ताने पुणे जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड यांनी सोमवारी (दि. १५) भोर तालुक्यातील सारोळे, सावदरे, पांडे आणि आंळदे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधताना खुटवड यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिका, घडा आणि पुढे चला” हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवून सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा आणि शाळेशी भावनिक नाते दृढ व्हावे, या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आत्मीयता वाढून शिक्षणाच्या प्रवासाची आनंददायी सुरुवात झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.




