काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.अनंतराव थोपटे यांच्या स्मृतींना पिंपरीत अभिवादन
पिंपरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री व पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अनंतराव थोपटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मासूळकर कॉलनी येथील स्व. नाना आफळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोकसभेत बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी थोपटे हे काँग्रेस विचारांचे निष्ठावंत नेते होते, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना जनतेशी नाते दृढ ठेवण्याचा दिलेला संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक रणसुंभे यांनी थोपटे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना सहा वेळा आमदार म्हणून त्यांनी भोर तालुक्याच्या विकासासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले. शिक्षण, शेती, सहकार, रस्ते व ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर यांनी थोपटे यांना ‘भोरचे भाग्यविधाते’ संबोधत त्यांच्या तळागाळाशी असलेल्या नात्याचा गौरव केला. शेतकरी, कामगार, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी आयुष्यभर झटल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक सतीश दरेकर, चिंतामणी सोंडकर, सुरज कुलकर्णी, उमेश बनसोडे, जितेंद्र छाबडा आदींनीही मनोगते व्यक्त करत थोपटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेली ही शोकसभा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.




