माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन ! भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यावर शोककळा !! राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त
भोर : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी शिक्षणमंत्री तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनंतराव नारायणराव थोपटे यांचे गुरुवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने भोर तालुक्यासह पुणे जिल्हा आणि राज्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
११ जानेवारी १९३३ रोजी जन्मलेल्या अनंतराव थोपटे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत जनतेशी नाळ जोडून विकासाभिमुख नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली. भोर विधानसभा मतदार संघातून ते तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शिक्षण, सहकार आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम करत मतदारसंघाच्या विकासाला गती दिली.
महाराष्ट्र शासनात त्यांनी सुमारे १४ वर्षे विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. शिक्षणमंत्री म्हणून राज्यातील शैक्षणिक विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावत विकासकामांना चालना दिली.
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही त्यांनी काँग्रेसशी निष्ठा कायम ठेवत विधिमंडळात पक्षाचे गटनेते म्हणून जबाबदारी पार पाडली. संयमी, अभ्यासू आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखणारे नेतृत्व म्हणून त्यांना मान मिळाला होता.
अनंतराव थोपटे यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत असून विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.




