भोर तालुक्यातील मोरवाडीच्या ईश्वरी मोरेने वर्ड पॉवर चॅम्पियनशिपमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवला
कापूरहोळ : लीप फॉरवर्ड संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी गुणवत्तेसाठी राबवलेल्या आकलनासह इंग्रजी वाचन उपक्रमांतर्गत यंदा १३ हजार विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेत भोर तालुक्यातील मोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीची ईश्वरी मनोज मोरे हिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवून खणखणीत यश मिळवले.
मुंबईहून पोस्टाने प्राप्त झालेल्या बक्षिसांचे वितरण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते शाळेत सन्मानपूर्वक करण्यात आले. बक्षिसांमध्ये स्टडी टेबल, टिफिन बॉक्स, मिल्टन वॉटर बॉटल, स्कूल बॅग, मेडल व प्रमाणपत्राचा समावेश होता. याच स्पर्धेत प्रांजल जालिंदर साळुंके हिला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला, त्यानिमित्त तिला बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, गटशिक्षणाधिकारी सचिन लोखंडे यांच्या प्रेरणेत विस्तार अधिकारी सुनीता गायकवाड, केंद्र प्रमुख साधना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका वैशाली सुतार, वर्गशिक्षक अरुण होडशिळ यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक बाळासाहेब गायकवाड, सुरेश जाधव यांचे सहकार्य मिळाले. सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे जोरदार अभिनंदन केले. या यशाने शाळेचा व ग्रामस्थांचा गौरव झाला.




