पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या मातोश्री श्रीमती शुभांगी शिवतरे यांना आदर्श माता पुरस्कार
पुणे : दि. 12 जानेवारी 2025 रविवार शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोन स्वराज्याच्या छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा लाल महालात दर वर्षी आयोजित करण्यात येतो. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला लाल महाल ही वास्तू शिवप्रेमींची आस्मिता असून या लाल महालात दर वर्षी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात येतो, तसेच या माध्यमातून जिजाऊ आणि शिवरायांचे स्वराज्य विचार जनमानसात घरोघरी रुजावे यासाठी मराठा सेवा संघ व अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती तर्फे आखंड कार्य चालु असते.
माता ही एक शक्ती असते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ, जिजाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय आणि स्वराज्य राखणारे छत्रपती शंभुराजे घडविले, स्वराज्य संकल्पनेची बीजे या मातेनेच शिवरायांच्या मनात लहानपनीच पेरली होती, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांनी तशी तयारी केली, आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार रुचवण्याचे सामर्थ्य प्रत्येक आई मध्ये असते, स्त्रीने आपली शक्ती ओळखून राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे.
जीवन म्हणजे एक आव्हान असुन त्यास प्रत्येकाला समोर जावेच लागते, पण काही जण खडतर परिस्थितीच्या वादळातही जिद्द व परिश्रमाच्या जोरावर समाजात आपला नावलौकिक निर्माण करतात, ऊत्रोली तालुका भोर येथील मातोश्री श्रीमती शुभांगी शिवाजीराव शिवतरे या नवदुर्गेचा प्रवास असाच काहीसा आहे, प्रतिकूल परिस्थितीत मुलांना सांभाळून त्यांना उच्च शिक्षण देऊन सर्वसामान्य महिलांसमोर आपला आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी समाजात आदर्शवत काम करणारी पुढील पिढी निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केल्याने त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच त्यांना या कार्याकरीता आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले, अखिल भारतीय शो महोत्सव समिती अध्यक्ष विकास पासलकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार) पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर या मान्यवरांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार श्रीमती शुभांगी शिवाजीराव शिवतरेना देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे , राजेंद्र डूबल प्रशांत धुमाळ, कैलास वडगुले हे मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते, तसेच मराठा सेवा संघ ,अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, अखिल शिवाजी नगर शिवजयंती उत्सव समिती, राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन आणि सर्व शिवप्रेमी नागरिक व विविध संघटना यांच्या वतीने आदर्श मातेचा सन्मान केला.




