अवैध धंदे, दारू, गांजा विक्रेत्यांना इशारा ! कायदा मोडाल तर कारवाई अटळ : पोलिस निरीक्षक संतोष जाधव
कापूरहोळ : राजगड पोलिस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर भूमिका जाहीर केली आहे. अवैध धंदे, भाडेकरू पडताळणी, कामगारांची चारित्र्य पडताळणी, युवकांमधील व्यसनाधीनता आणि सायबर गुन्हे या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंपन्या, कारखाने व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक असल्याचे जाधव यांनी सांगितले. संबंधित माहिती पोलिसांकडे न सादर करणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिस ठाण्यात जमा करणे आवश्यक असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये तसेच गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हे प्रतिबंध आणि तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रत्येक गावात व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, हातभट्टीची दारू, अवैध मद्यविक्री, गांजा, तसेच बुलेटचा कर्कश आवाज काढणारे व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देत कायदा मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे जाधव यांनी ठामपणे सांगितले.




