गाईला वाचवताना शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत ! विजेच्या शॉकने शेतकरी व गाईचा जागीच मृत्यू
वेल्हा : राजगड तालुक्यातील सिंगापूर-कुसारपेठ येथे विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा तसेच त्यांच्या गाईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ढेबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सिंगापूर-कुसारपेठ येथील शेतकरी विठ्ठल भागू ढेबे (वय ५५) हे आपल्या गाईंना चरण्यासाठी गावालगतच्या डोंगर परिसरात घेऊन गेले होते. त्यावेळी जवळील वीज खांबावरील तार अचानक तुटून एका गाईच्या अंगावर पडली. त्यामुळे गाईला विजेचा तीव्र धक्का बसला. गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात विठ्ठल ढेबे यांनी तातडीने धाव घेतली मात्र तुटलेल्या तारेला स्पर्श होताच त्यांनाही जोरदार विजेचा शॉक बसला. यात शेतकरी व गाय या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
महावितरणचे उपअभियंता सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, वीज खांबावरील चिनी मातीच्या इन्सुलेटरला तीव्र उष्णतेमुळे तडा जाऊन तो फुटल्याने तार तुटून खाली पडली आणि हा अपघात घडला.
या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून मृत शेतकरी व जनावराच्या नुकसानभरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची नियमित तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




