पुण्यामध्ये मुस्लिम विवाह सोहळ्यात पार पडला हिंदू विवाह ! जाती धर्मापेक्षा माणुसकीच महत्वाची
रुबिना शेख,
पुणे.
पुणे: वानवडी येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या लॉनवर संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे यांचा विवाह सोहळा मंगळवार दि. 20 मे रोजी सायंकाळी सातच्या मुहूर्तावर होणार होता, परंतु सायंकाळी पाच वाजता आकाशात विजा चमकत असताना पावसाचे ढग दाटून आले अन् अवघ्या काही क्षणांत मुसळधार पाऊस पडू लागला. संपूर्ण लॉन पाणीच पाणी झाल्याने लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची अक्षरशः दाणादाण उडाली. वधू-वराला सुद्धा उभे राहण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती, लग्नासाठी आलेले सर्वजण पावसापासून संरक्षण व्हावे म्हणुन काही ना काही आडोसा शोधुन थांबले होते.
लग्न लावणारे पुजारी काकांची लग्नाच्या विधीची तयारी सुरू होते. वधु-वर सजून मांडवात पोहोचणार होते त्यांच्या अगोदरच पाऊस आला, पाऊसाने सर्व पाहुण्याचे स्वागत सुरू केले, बघता-बघता धो धो पाऊस सुरू झाला. ज्या लॉनमध्ये लग्न होणार होते, त्या लॉनमध्ये पाणीच पाणी झाले होते,पाहुणे मंडळी, नातेवाईक, वधु- वराची आई वडील ही पावसात चिंब भिजले आता विवाह सोहळा पूर्ण कसा करायचा असा प्रश्न सर्वांन समोर निर्माण झाला होता,
यावेळी वधुच्या बापाच्या मदतीला ना त्याच्या जातीचा ना धर्माचे असणारे फारुक काझी धाऊन आले लग्न होणाऱ्या लॉन शेजारीच असलेल्या एका हॉलमध्ये मुस्लिम धर्मीय नवविवाहित मोहसीन-मोहीन यांचा स्वागत समारंभ सोहळा सुरु होता. फारूक काझी यांनी त्यांच्या नवविवाहित जोडप्याला मंचावरून खाली उतरायला सांगितले. व चि. सौ. का संस्कृती व चि. नरेंद्र यांच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांचा हा मंच स्वखुषीने रिकामा करून दिला.
संस्कृती-नरेंद्र आणि मोहसीन-मोहीन या चारही कुटुंबीय, त्यांचे आप्तेष्ट आणि मित्र परिवार अशा मोठ्या वऱ्हाड मंडळींच्या साक्षीने या मुस्लिम विवाह सोहळ्यात संस्कृती व नरेंद्राचा हिंदु विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर लगेचच सर्वांनी मिळुन मोहसीन आणि माहीनचा स्वागत सोहळा साजरा केला.




