जगातील सर्वात उंच शिल्प ” स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण ” ला ऐतिहासिक मानवंदना
संतोष आडसुळ,
उपसंपादक.
पिंपरी-चिंचवड : भोसरीतील मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यात आला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला रविवारी १४ सप्टेंबर रोजी परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या ढोल- ताशा महासंघाच्या वतीने जगातील सर्वांत उंच शिल्प “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” ला ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली. यावेळी ३ हजार ढोल, १ हजार ताशा अन् ५०० हून अधिक भगवा ध्वज होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभर फूट उंचीच्या पुतळ्यामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. दर्शनी भागात असल्याने चारही बाजूंनी पुतळा दृष्टीस पडणार आहे. त्यामुळे शहराच्या पर्यटनास चालना मिळेल. तसेच येत्या दि. २ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती शिल्पाच्या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे, दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन व भव्य लोकार्पण सोहळ्याने होणार आहे.
तसेच पुतळ्याभोवती आकर्षक ध्वनी आणि विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मुख्य प्रसंगांवर आधारित म्युरल उभारले जाणार आहेत. संभाजी महाराज यांच्या जीवनावरील, तसेच ऐतिहासिक साहित्य आणि शस्त्रांचे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. थिएटर, सुशोभीकरण, रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित कलाकृती साकारण्यात येणार आहेत. सुबक कलाकुसरीची सजावटही केली जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन व भव्य लोकार्पण सोहळ्याने होणार आहे. या स्मारकाचे नाव ‘शंभूसृष्टी’ ठेवले असून, हे जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज स्मारक असणार आहे.




