माहेर संस्थेतर्फे भिल्ल वस्तीमध्ये प्रथमच बालदिन मोठ्या उत्साहात साजरा
वार्ताहर ✍🏻
श्री. वैभव पवार, शिक्रापूर.
शिक्रापूर : दिनांक 08 नोव्हेंबर 2025, शनिवार रोजी शिक्रापूर-जातेगाव रोड येथील भिल्ल वस्तीमध्ये माहेर संस्थेच्या वतीने प्रथमच बालदिनाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागतानंतर मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी आनंदाने सहभाग घेतला आणि वातावरण हास्य-खेळांनी रंगून गेले. विजेत्यांसह सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
तसेच सर्वांना स्वादिष्ट खाऊचा आस्वादही घेऊ देण्यात आला.या सोहळ्यावेळी माहेर संस्थेच्या विश्वस्त डॉ. निकोला जयंत पवार तसेच जर्मनीहून आलेले माहेर संस्थेचे मित्रपरिवार व शुभचिंतक उपस्थित होते. सौ. कुसुमताई मांढरे यांनी मुलांसाठी विशेष भेट वस्तू दिल्या. हा कार्यक्रम भिल्ल वस्तीमध्ये प्रथमच झाल्यामुळे तेथील महिला आणि रहिवासी अत्यंत उत्साहित व आनंदित झाले.सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन माहेर संस्थेच्या कला कौशल्य व स्वावलंबन प्रकल्प प्रमुख सौ. तेजस्विनी पवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिनी एम.जे., जयश्री पळसे, निर्मला तोडकर, सीमा सावंत, राजू तायडे, राजू साकोरे, प्रकाश कोठवळे, विक्रम भुजबळ आणि सुशील पोहेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
भिल्ल वस्तीत प्रथमच माहेर संस्थेच्या उपक्रमामुळे आनंदाचा उत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाने तेथील मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आणि समाजातील एकात्मतेचा सुंदर संदेश दिला.




