भोर सहकार भारती संस्थेच्या अध्यक्षपदी सदाशिव धुमाळ
भोर : सहकार भारती संस्थेच्या भोर तालुका अध्यक्षपदी सदाशिव धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.सहकार भारतीचा दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्ग नुकताच आळंदी येथे पार पडला. त्या वेळी सहकार भारती चे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी पुणे जिल्ह्याची कार्यकारीणी घोषित केली,त्या मध्ये श्री.धुमाळ यांचे नावाची घोषणा करण्यात आली.
सहकार भारती ही १९७८ मध्ये सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी स्थापन झालेली समर्पित संघटना असून गेली ४४ वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू असून संपूर्ण देशभरातील पाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू असल्याचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी सांगितले.
बिना सहकार नही ऊध्दार हे सहकार चळवळीचे ध्येयवाक्य आहे. परंतु सहकार हा ख-या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित व्हावयाचा असेल तर त्यातील काम करणारे सर्वच लहान थोर कार्यकर्ते हे समाजसेवी वृत्तीचे असले पाहिजेत म्हणून सहकार भारती ने बिना सहकार नही ऊध्दार या ध्येय वाक्याला बिना संस्कार नही सहकार अशी अर्थपूर्ण जोड दिली आहे व या दोन वाक्यातूनच आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे , अशी माहिती सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश चे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी दिली.
सहकारी साखर कारखान्यातील कामाचा अनुभव असल्यामुळे सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले जातील असे मत निवडी नंतर धुमाळ यांनी व्यक्त केले. धुमाळ यांचे निवडी बद्दल सहकार भारतीचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर , महाराष्ट्र प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.


