देशात भीमाशंकर सहकारी कारखानाच पुन्हा एकदा ठरला नंबर वन
आंबेगाव : दि.9/7/2024 (मंगळवार) सन २०२२-२३ करीता “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे, देशातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता,तांत्रिक गुणवत्ता,वित्तीय व्यवस्थापन,अधिकतम ऊस गाळप,साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना,कर्ज परतफेड,व्याज,खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक,वेळेत अदा केलेला ऊस दर,ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे मुल्य, शिल्लक कर्ज, उभारणीची मर्यादा, कारखान्याने उभारणीसाठी केलेला खर्च,शिल्लक निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन,उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन तसेच मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक,रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन,साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा व विजेचा कमीत कमी वापर,साखर उत्पादन प्रक्रीयेमध्ये बगॅस वापर कमी आहे.गाळप क्षमतेचा वापर योग्य प्रकारे करून बगॅस बचत,साखरेच्या व्ययामध्ये घट व देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर,शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होण्यास कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन,संचालक मंडळाचे धोरण,अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन,सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे,कारखान्यास देश पातळीवरील १२ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २६ पुरस्कार प्राप्त झालेले आहे,देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला आहे.




