राजगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ! जांभळी खून प्रकरणाचा ६ तासांत उलगडा !! नेपाळी तरुणास कात्रज येथून अटक
नसरापूर : भोर तालुक्यातील जांभळी येथील हॉटेल परिसरात घडलेल्या भयानक खून प्रकरणाचा राजगड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उलगडा करत आरोपीला बेड्या घातल्या. सागर लक्ष्मण कुमार राणा (वय वर्ष २०) मुळगाव पाटण, बैतडी, नेपाळ) या नेपाळी तरुणास अटक केली आहे, मोबाईल न मिळाल्याच्या किरकोळ वादाने त्याने हॉटेल मालकाचे सासरे किसन बाप्पू सुर्वे (७५, रा. जांभळी, मूळ भोंगवली) यांची क्रूर हत्या केली.
हॉटेल मालक अनिल सखाराम रसाळ (४८) यांच्या फिर्यादीनुसार, सुर्वे हे हॉटेलात काम करत होते. राणाने मोबाईल मागितला, नाकारल्यावर संतापून त्याने सुर्वे यांच्यावर वार केले. जखमी सुर्वे रक्तबंबाळ होऊन खाली पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तात्काळ तपासास गती दिली.
पोलिसांच्या गोपनीय सूत्राने कात्रज चौकात नेपाळ पलायनाच्या तयारीत असल्याची माहिती दिली. गवळी यांनी दोन विशेष पथके पाठवली. अचूक सापळ्यात राणाला पकडले गेले. या कारवाईत उपनिरीक्षक अजित पाटील, हवालदार मदने, निबांळकर, अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, समीर भालेराव, राहुल भडाळे यांचा मोलाचा वाटा.
राजगड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राठोड करत आहेत. या घटनेने किरकोळ वाद किती घातक ठरू शकतात, याचा इशारा मिळाला आहे.




