शिवप्रहार प्रतिष्ठानकडून डॉ.मंदार माळी व पत्रकार रमाकांत मोरे यांचा ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान
किकवी : शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा समाजरत्न पुरस्कार सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील अथक व निस्वार्थी सेवेबद्दल डॉ. मंदार सुरेश माळी व निर्भीड पत्रकार रमाकांत वासुदेवराव मोरे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
डॉ. मंदार माळी हे गेल्या ११ वर्षांपासून किकवीतील १०८ आपत्कालीन मेडिकल ऑफिसर म्हणून समर्पितपणे कार्यरत आहेत. कोविड महामारीत अहोरात्र सेवा, प्रसूतीसह अर्धांगवायू व रस्ते अपघातातील जखमींना वेळीच उपचार देऊन त्यांनी अनेकांना जीवनदान दिले. त्यांच्या या निष्कलंक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी सांगितले.
दुसरीकडे, पत्रकार रमाकांत मोरे यांनी लेखणीच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करत समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. सत्य मांडणे, सामाजिक हिताची जाणीव जागृत करणे या त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना हा सन्मान देण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात बोलताना संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते म्हणाले, “डॉ. माळी व पत्रकार मोरे यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. अशा सेवावृत्ती व्यक्तींमुळे समाज मजबूत होतो.” उपस्थितांनी दोन्ही मान्यवरांना भविष्यातील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार सामाजिक सेवेच्या क्षेत्रात नव्याने प्रेरणा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
हा भव्यदिव्य सन्मान सोहळा किकवी येथे पार पडला. या सोहळ्यात प्रतिष्ठानचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




