सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक पदी स्थान मिळावे : डॉ.आम्रपाली मोहिते
पुणे : सर्व महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून एक तृतीयपंथी (पारलिंगी) व्यक्तीची निवड सर्व राजकीय पक्षांनी करावी, अशी मागणी डॉ. आम्रपाली मोहिते यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ यांना निवेदन सादर दिले आहे. तृतीयपंथी समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे सांगितले.
डॉ. मोहिते म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये तृतीयपंथी समुदायाला तिसरे जेंडर म्हणून मान्यता दिली. मात्र, रोजगार, शिक्षण आणि निवडणुकांमध्ये या समुदायाला अद्याप राखीव कोटा मिळालेला नाही. भारताचे नागरिक असूनही समाजाचा अविभाज्य घटक असलेला हा समुदाय मागासलेला आहे. त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विशेष धोरण आखावे.
“निवेदनात स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत तृतीयपंथी समुदायाचा विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे या समाजाला राजकीय सहभागाची संधी मिळेल आणि समानतेचा अधिकार मिळेल, असा विश्वास डॉ. मोहिते यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ यांनी निवेदन स्वीकारून योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले असुन या मागणीने तृतीयपंथी समाजात उत्साह निर्माण झाला आहे, राजकीय पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असुन विशेष धोरणाअभावी या समुदायाला अडचणींचा सामना करावा लागतो. आता सर्व राजकीय पक्ष महानगरपालिका निवड प्रक्रियेत बदल करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




