कामथडी पंचायत समिती गण ! कापूरहोळ ग्रामस्थांचा वैशाली गाडे यांच्या उमेदवारीला १००% पाठिंबा जाहीर
कापूरहोळ : कामथडी पंचायत समिती गणमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार सौ. वैशाली गोविंद गाडे यांच्या उमेदवारीसाठी कापूरहोळ गावचे ग्रामस्थांनी शनिवारी (दि.१७ जाने.) रात्री झालेल्या ग्रामसभेत एकमताने १०० टक्के पाठिंबा जाहीर केला.
गावातीलच उमेदवार असल्याने सर्व ग्रामस्थांनी मतदान करून त्यांचा विजय साकार करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.या एकजुटीच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. गावकऱ्यांच्या या उत्साहाने निवडणूक रंगत वाढली असुन कामथडी गणातील राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. वैशाली गाडे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास घडवण्यासाठी सर्वजण एकत्र येणार आहेत.
या ऐतिहासिक सभेत कापूरहोळ गावाच्या गौरवशाली ओळखीचा उल्लेख आणण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ मता गाडे यांचे वंशज असलेल्या या गावाचा मतदार संघातील पंचक्रोशीत निर्णायक प्रभाव आहे.
सभेची सुरुवात ग्रामदेवी जानुबाईची आरती घेऊन झाली, तर समारोप पसायदानाने पार पडला. ग्रामस्थांनी वैशाली गाडे यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत, निवडणुकीत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. तसेच यावेळी राहुल गाडे यांनी कापूरहोळ ग्रामस्थांचे आभार मानले.




