अडबलसिद्धनाथ गाडेबगाड सोहळा भक्तीमय उत्साहात साजरा
कापुरहोळ : भोर तालुक्यातील धागंवडी येथे गुरुवारी (दि. २) पांडवकालीन श्री अडबलसिद्धनाथ गाडेबगाड यात्रा उत्सव मोठ्या श्रद्धा-भक्तीने साजरा झाला. चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या हनुमान जयंतीनिमित्त पुणे, सातारा,धाराशिव जिल्ह्यांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
गुरुवारी निगडे गावातील म्हखाळेदेवी पालखीचे आगमनाने सोहळ्याला सुरुवात झाली. ढोल-ताशे, बॅंडबाजा आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य गाडेबगाड गावातून १२ बैलांच्या जोड्याने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अडबलसिद्धनाथ मंदिरापर्यंत ओढत आणला व गाडेबगाडावरील दोन मानकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने फिरवत मंदिरात दर्शन घडविले. भक्तांच्या जयघोषाने वातावरण भारावले.
पुणे-सातारा महामार्गावरून प्रस्थान करताना राजगड पोलीस आणि सारोळा वाहतूक शाखेने उत्तम नियोजन केले. काहीवेळ वाहतूक थांबविण्यात आल्याने प्रवाशांनीही दर्शन घेतले. पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ व भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपरिक उत्साहाने हा भक्तिमय सोहळा यशस्वी झाला.
प्राचीन जागृत अडबलसिद्धनाथ देवस्थानात मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. फक्त यात्राकाळातच गर्दी असते असे नाही तर दर रविवारी भाकिकांची मोठी गर्दी असते अशी माहिती पुजारी गोविंद मांडके यांनी दिली.




