निरा नदीत वृद्धाचा मृतदेह तरंगताना सापडला ! तीन दिवसांपासून होता बेपत्ता
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) गावाजवळील नीरा नदीपात्रात गुरुवारी (२६ मार्च) सकाळी ७४ वर्षीय वृद्धाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात हळहळ आणि खळबळ उडाली. स्थानिक तरुण सौरभ भानुदास धाडवे (२६) व मित्रांनी माशांच्या पिंजऱ्यासाठी नदीकडे गेल्यावर पाण्यातील ही भयावह दृश्य पाहिले. त्यांनी तात्काळ राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली.
माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह बाहेर काढून तपासणी केली असता खिशातील ओळखपत्रावरून तो सातारा येथील जयमल्हार सोसायटीचा रहिवासी रविंद्र शंकरराव राउत (७४) असल्याचे उघड झाले. ते मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
नातेवाईकांनी शवओळख पटवली. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही.
मृतदेह उपजिल्हा रुग्णालय भोर येथे पाठवण्यात आला. राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद नोंदवली असून, पुढील तपास पोलीस हवालदार नाना मदने करीत आहेत.
नदीकाठावर वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.




